सेंद्रिय शेती
म्हणजे नैसर्गिक साधनाचा वापर करून औषध, खते तयार करणे व पारंपारिक बियाणाचा वापर करून केलेली विषमुक्त म्हणजेच रसायनाचा वापर टाळून केलेली शेती म्हणजे सेंद्रिय शेती होय.[१] सेंद्रिय शेती म्हणजे परंपरागत शेती होय. शेती करताना रसायनाचा वापर न करता केवळ शेतातील पिकांचे अवशेष, शेण, गोमूत्र व नैसर्गिक साधनांचा वापर करून सेंद्रिय शेती केली जाते. हरितक्रांतीच्या आधी शेतामध्ये केवळ शेणखत वापरत असत. बियाणे सरळवाण म्हणजेच कोणत्याही प्रकारची प्रकिया न केलेले वापरत. यामुळे पिकांची गुणवत्ता वाढत असे. जमिनीमध्ये कर्ब योग्य प्रमाणात राहिल्यामुळे जमिनीची सुपीकता वाढून पिकाची वाढ योग्य होऊन उच्च प्रतीच्या व आरोग्यास पोषक असण्याऱ्या उत्पादनाची निर्मिती होत होती.

सेंद्रीय पद्धतीने शेती हरितक्रांतीपर्यंत झाली. हरितक्रांतीमध्ये रासायनिक खताचा अवलंब भारतात होऊ लागला. सुरुवातीच्या काळात शेतमालात मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळू लागले मात्र जमीन कठीण होऊ लागली. १९६० च्या काळात जमिनी लाकडी नांगराने नांगरत असत. ती नंतरच्या काळात लोखंडी नांगाराने नांगरावी लागे. त्यानंतर ट्रक्टरने शेती केली जाऊ लागली. त्यामागे लवकर शेतीची मशागत करणे व लोखंडी नांगराने जमीन नांगरली जाऊ शकत नाही. म्हणजेच रासायनिक औषधामुळे जमीन कठीण म्हणजेच मृत होत चालली आहे.

“शेती हा लोकांच्या उपजीविकेचे प्रमुख साधन असल्यामुळे शेती हा भारताचा आत्मा आहे”. शेती टिकविण्यासाठी सेंद्रिय पद्धतीचा वापर केल्यास रासायनिक खतांवर व औषधांवर होताना खर्च वाचू शकतो कारण सेंद्रिय शेतीमध्ये खते व औषध नैसर्गिक साधनांचा वापर करून तयार करतात. त्यामुळे त्यावर खर्च अल्पशा प्रमाणात होतो. सेंद्रीय शेती पद्धतीनुसार पारंपरिक बी-बियाणे वापरणे, जमिनीची धूप थांबविणे त्यासाठी योग्य ठिकाणी बांध घालणे, मशागत करणे शेण-गोमूत्राचा जास्त वापर करणे यामुळे वाफ्यात पाणी टिकून राहते. बैलांच्या मशागतीने जमिनीची नांगरणी उत्तम होते. नांगरणी उत्तम झाल्यामुळे पिकांची वाढ चांगल्या प्रकारे होते. तर रासायनिक खतांचे दर दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. रासायनिक खतांचा वापर केल्याने जमिनीचा कस कमी होऊ लागला आहे. त्यावर उपाय म्हणजेच सेंदिय शेती होय.[१]

बहुतांश राज्ये जास्त उत्पन्न मिळावे म्हणून रसायनांचा अतिवापर करीत आहेत. परिणामे कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. डॉ. रश्मी सांघि (संधोधन शास्त्रज्ञ, आय.आय.टी. कानपूर) यांनी सांगितले की, रासायनिक शेतीतून मिळालेल्या उत्पादनाचे सेवन केल्याने आईच्या दुधामध्ये रासायनिक औषधाचे अंश मिळाले आहेत.[२]

वैशिष्ट्यीकृत अल्बम नवीन

सेंद्रिय शेती खालील महत्वपूर्ण मुद्यांवर अवलंबून आहे जसे

मातीचे संवर्धन,
तपमानाचे व्यवस्थापन,
पावसाच्या पाण्याचे नियोजन आणि संवर्धन,
सौर उर्जेचा अधिकतम वापर व उपयोग,
गरजांमध्‍ये स्‍वावलंबन,
नैसर्गिक क्रमचक्र आणि जीवनाच्‍या स्‍वरूपांचे अनुपालन,
जनावरांची एकीकृतता,
नवीनीकरणीय संसाधनांवर अधिकतम अवलंबन, जसे पशु-बल
सेंद्रीय शेतीची मुख्य वैशिष्‍ट्ये
१) मातीचा सुपीकपणा कायम राखते.
२) सेंद्रीय शेती ही एक स्थायी आणि पर्यावरणास अनुकूल अशी उत्पादन प्रक्रिया आहे, ज्‍यामध्‍ये लहान शेतकर्‍यांसाठी विशिष्‍ट लाभ आहेत.
सेंद्रीय शेती खालील सुविधांच्‍या योगे अन्न-सुरक्षा आणि गरीबांच्या हाताला काम आणि दोन पैसे जास्त फायदा मिळवून देते. कमी संसाधने व पाऊसपाणी असलेल्‍या क्षेत्रांत उत्पादनाची वाढ होणे,
शेत आणि आसपासच्‍या क्षेत्रात जैव विविधता आणि नैसर्गिक संसाधनांचे जतन होणे,
मिळकत वाढवणे किंवा खर्च कमी करणे,
सुरक्षित आणि विभिन्न खाद्यान्‍नांचे उत्पादन घेणे.
१) मातीचे संवर्धन – रसायनांचा वापर थांबविणे, ओल्‍या गवताच्‍या जागी पिकाचे अवशेष उपयोगात आणणे, सेंद्रीय आणि जैविक खताचा उपयोग करणे, पीक क्रमचक्र आणि बहु-पिकांचा अवलंब करणे, अत्यधिक नांगरणी करणे टाळा आणि मातीस हिरव्‍या किंवा ओल्‍या गवताखाली झाका.
२) तपमानाचे व्यवस्थापन – माती झाकून ठेवा, बांधावर झाडे-झुडपे लावा.
३) माती आणि पावसाच्या पाण्याचे संवर्धन – पाझर टाक्‍या खणा, उतार असलेल्‍या जमिनीवर समोच्‍च बांध घाला आणि समोच्च पंक्ति शेतीचा अवलंब करा, शेत-तलाव खणा, बांधांवर कमी उंचीचे वृक्षारोपण करा.
४) सौर उर्जेचा वापर करणे - वर्ष भर विविध पिके आणि वृक्षारोपण कार्यक्रमाच्‍या संयोजनाच्‍या माध्यमाने अधिक हिरवाई मिळवा.
५) स्वतःच्या गरजांमध्‍ये स्‍वावलंबन- स्‍वत:च बियाण्‍याचा विकास करा, कंपोस्‍ट, वर्मीकंपोस्‍ट, वर्मीवॉश, द्रव खते आणि वनस्पति अर्काचे उत्पादन.
६) जैववैविध्याचे अनुपालन – जीववैविध्य टिकून राहावे म्‍हणून आवास विकास करा, कीटकनाशकांचा वापर कधीही करू नका, जैववैविध्‍य निर्माण करा.
७) जनावरांची एकीकृतता – जनावरे ही सेंद्रीय व्यवस्थापनाचे महत्वपूर्ण घटक आहेत आणि हे फक्‍त पशु-उत्पादनेच पुरवित नाहीत तर मातीमध्‍ये वापर करण्‍यासाठी पुरेसे शेण आणि मूत्र प्रदान करतात.
८) नवीनीकरणीय उर्जेचा वापर - सौर उर्जेचा, बायोगॅस आणि बैलांच्‍या द्वारे चालविण्‍यात येणारे पंप, जनरेटर आणि इतर यंत्रे ह्यांचा उपयोग करा
सेंद्रिय खतांचे प्रकार
वनस्पती व प्राणी यांच्या अवशेषापासून जे खत तयार होते त्याला सेंद्रिय खत म्हणतात.
सेंद्रिय खतांमध्ये महत्त्वाची खते म्हण्जे शेणखत, कंपोस्ट, हिरवळीची खते, गांडूळ खते, माश्यांचे खत, खाटिक खाण्याचे खत, हाडांछे खत, तेलबियांची पेंड इत्यादी.
१) शेणखत : शेण, मुत्र, गोठ्यातील पालापाचोळा इत्यादी घटकापासून तयार होणा-या खताला शेणखत म्हणतात. त्यामध्ये नत्र, स्फूरद व पालाश असते. शेणाचा महत्त्वाचा उपयोग म्हण्जे बायोगँसमध्ये उर्जा निर्मितीसाठी होतो आणि शिल्लक राहिलेले पातळ शेण पिकांच्या वाढीसाठी पोषक अन्नद्रव य म्हणुन वापरले जाते.
२) कंपोस्ट खत :- शेतातील गवत, पिकांचे कापणीनंतर उरलेले अवशेष, भुसा, उसाचे पाचट, कापसाची धसकटे इ. सेंद्रिय पदार्थाचे सुक्ष्मजीवजंतु मुळे विघटन होऊन त्यातील कार्बन नत्राचे प्रमाण कमी होते व चांगला कुजलेला पदार्थ तयार होतो त्याला कंपोस्ट म्हणतात. यामध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश असते.
३) हिरवळीची खते :- लवकर वाढणा-या पीकांची निवड करून, त्यांची दाट पेरणी करुन पीक फुलो-यावर येण्याच्या आधी ते नागराच्या सहाय्याने जमिनीत गाडतात त्यापासून जमीनीला नत्र मिळते. जमिनीचा पोत सुधारतो व ती सुपीक बनते. अशा खतांना हिरवळीचे खत म्हणतात.
गाडलेल्या पिकांना कुजण्य़ासाठी दीड ते दोन महिन्यांचा कालवधी लागतो.
ताग, धैच्या, मूग, चवळी, गवार, शेवरी, बरसीम, ग्लीरीसिडीया तागापासून नत्राचा पुरवठा ५ ते ६ आठवड्यात होतो.मुगाचा पालापाचोळा जमिनीत गाडल्यामुळे गव्हाच्या उत्पादनात चांगली वाढ होते.
४) गांडूळ खत - ह्या खतात गांडूळाची विष्ठा, नैसर्गिकरित्या कुजलेले पदार्थ, गांडूळाची अंडीपूंज, बाल्यावस्था आणी अनेक उपयुक्त जीवाणूंचा समावेश असलेल्या खताला गांडूळ खत म्हणतात.
५) माशाचे खत - समुद्रकिनारी वाया गेलेल्या माशांपासून तसेच माशाचे तेल काढल्यानंतर उरलेल्या अवशेषापासून जे खत तयार होते ज्यात नत्र, स्फुरद आणि पालाश यांचे प्रमाण भरपूर असते याला माशाचे खत म्हणूनही म्हंटले जाते.
६) खाटीकखान्याचे खत - खाटीकखान्यात जनावरांचे रक्त व अवशेषापासून जे खत बनवितात त्याला खाटीकखान्याचे खत म्हणतात यात नत्र आणि स्फुरद चांगल्या प्रमाणत असते.